Jangad (जांगड । आत्मकथा)

(0 User reviews)   41
Chandu Doma Rathod Swayam Prakashan 2026
First Edition 224 Marathi
'जांगड' ही नाट्यकलावंत चंदू डोमा राठोड यांची आत्मकथा असून, जांगड प्रथेचे वास्तव, उपेक्षित जीवन, संघर्ष, वेदना आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रामाणिक इतिहास मांडणारे महत्त्वपूर्ण मराठी पुस्तक आहे.

जगण्याचा संघर्ष उलगडणारे आत्मकथन- 'जांगड'

गोर साहित्य शिवारामध्ये प्रसिद्ध लेखक तथा नाट्य कलाकार श्री. चंदू  डोमा राठोड यांचे जांगड या  आत्मकथनाची भर पडलेली आहे ही गोर बंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्ध मानावी लागेल. गेल्या काही वर्षात तांडाकार आत्माराम राठोड यांचा 'तांडा', याडीकार पंजाबराव चव्हाण यांची 'याडी, नामदेवराव राठोड यांचे 'वादळवाट, नामदेव चव्हाण यांचे 'लदणी', राजाराम जाधव यांचे 'अधारयात्रीचे स्वप्न', शिवाजी जाधव यांचे 'आयुष्य जगताना', डॉ. वसंत भा. राठोड यांचे 'कल्लोळ',  प्रा. डॉ. युवराज पवार यांचे 'दयन', श्री. तात्याराव चव्हाण यांचे 'संघर्षाचं सोनं, ही सर्व आत्मकथने गोरबंजारा समाजाच्या जगण्यातील प्रचंड संघर्ष, आणि वेदना व्यक्त करतात त्यामुळे ही आत्मकथने केवळ गोर बंजारा समाजामध्येच नाही तर मराठी साहित्य शिवारात सुद्धा प्रचंड गाजलेली आहेत. वरील सर्व आत्मकथनातील संघर्ष आणि लेखक चंदू राठोड यांच्या 'जांगड' या आत्मकथनेतील संघर्ष व जीवन प्रवास वेगळा आहे. तांड्यात राहणारी ही सर्व लेखक मंडळी आपला संघर्षमय जीवन प्रवास आपल्या आत्मकथेतून सडेतोड मांडली आणि तांड्यातील प्रचंड वेदना आणि दुःख जाहीर केले.

 

"जांगड" ही आत्मकथा केवळ लेखक चंदू राठोडची नाही तर ती तमाम तांड्यात संघर्ष करणाऱ्या तमाम तरुणाची जगण्याचा संघर्ष उलडणारी आत्मकथा आहे. लेखक चंदू राठोड हे प्रसिद्ध नाट्य कलावंत असून एक सवेदनशील लेखक आहेत. त्यामुळे त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.!
गोर बंजारा समाजामध्ये पूर्वीच्या काळी विकत घेतलेल्या किंवा हरवलेल्या, मुलाकडून सधन कुटुंबात गुलामासारखी कामे घरून घेण्याची प्रथा गोरबंजारा समाजात अस्तित्वात होती. मुलगा वयात आला तर तांड्याच्या नायकाच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत संस्कार करून त्याला स्व जातीत सामावून घेतल्याची प्रथा म्हणजे 'जांगड' होय. या जांगड प्रथेमुळे अनेकांच्या जीवनात प्रचंड वेदना आणि दुःखदायी प्रसंग आले .त्यांचे जीवन संघर्षमय आणि अत्यंत खडतर असे. अशाच कुप्रथेचे बळी ठरलेल्या आणि संघर्षमय कुटुंबात जन्मलेल्या लेखकाने आपला जीवन प्रवास अत्यंत प्रामाणिक पणे या आत्मकथनात उजागर केलेला आहे.
शाळा शिकत असताना लेखकाच्या वाटयाला आलेले अभावग्रस्त जीवन, रोजच्या जगण्यातील मारामार  तरीही लेखकाने शून्यातून विश्व निर्माण करून आपला संघर्षमय जीवन अत्यंत हृदयस्पर्शी आणि रोमांचकारी मांडल्यामुळे वाचकांच्या मनाला चटका लावून जाते.

 

या पुस्तकाला प्रसिद्ध गोर साहित्यिक प्रा. डॉ. युवराज पवार धुळे यांची भारदस्त प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत लेखक चंदू राठोड यांना अस्सल नाट्य कलावंत तर म्हटलेच पण एक प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांचा गुणगौरव केलेला आहे. आजकाल आत्मकथन विषयावरील पुस्तके छापणे, साहित्य क्षेत्रात धाडसाचे मानले जाते. कारण आत्मकथन लिहिणे म्हणजे लेखकाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहे, त्या बऱ्या वाईट असो कि,मान -अपमानाच्या त्या जशाच्या तशा, काहीही आड पडदा न ठेवता नमूद करणे तरच ते लेखकाचे यशस्वी आत्मकथन मानल्या जाते. अगदी याच पद्धतीने लेखक चंदू राठोड यांनी आपल्या जीवनामध्ये ज्या काही बऱ्या वाईट घटना घडलेल्या आहेत त्या अगदी प्रामाणिकपणे सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या आहेत हेच या 'जांगड' आत्मकथनाचे यश आहे. उत्कृष्ट मुखपृष्ठ  आणि छपाई त्याबद्दल स्वयं प्रकाशनचे मनापासून कौतुक करतो.

 

'जांगड' हे आत्मकथन वाचताना वाचकाला एक विलक्षण अनुभूती येते. वाचन जसे जसे पुढे सरकते तशी तशी उत्कंठा वाढत जाते 'पुढे काय? हा प्रश्न मला हे आत्मकथन वाचताना सतत सतावत होता. लेखक हे नाट्य कलावंत असल्यामुळे त्यांची निवेदन शैली सुंदर आणि अप्रतिम असल्यामुळे त्यांनी वाचकाला 'जांगड' या आत्मकथनांमध्ये खिळवून ठेवण्याची किमया सहज साध्य केलेली आहे.
या आत्मकथनामध्ये तीन पिढ्यांचा संसार आणि त्यांची गुंतागुंत असलेली कथा तरी ती वाचन करताना हळूहळू उघडत जाते. लेखक 'जांगड' या आत्मकथनाची सुरुवात करताना लिहितात...माझे आजोबा भिकाजी राठोड व आजी खमरीबाई यांना सीता, सुबरी, धुरपती आणि पार्वती या चार मुली होत्या.घरची परिस्थिती म्हणजे अठरा विश्व दारिद्र्याची. या चार मुलीच्या पाठीवर मुलगा जन्माला आला तेव्हा माझ्या आजी आजोबांना खूप आनंद झाला त्या मुलाचं नाव "आनंदा" ठेवलं; परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दोन-तीन दिवसाच्या साध्या तापांने त्या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला. तेव्हा आजी आजोबा पुत्र विरहाच्या दुःखाने खूपच खचून गेले .दोघांचे अंगात त्राणच उरलं नव्हतं. काय करावं काही त्यांना सुचत नव्हतं. अशातच गावातील राम मास्तर नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, धामणगाव देव येथील मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेऊन नवस बोलून या'  ही आत्मकथनाची सुरुवातच लेखकाने एखाद्या सुपर डुपर चित्रपटाच्या स्टोरीलाही लाजवेल अशीच  केलेली असल्यामुळे नक्कीच हे पुस्तक वाचकाच्या पसंतीस उतरेल असे माझे प्रामाणिक मत आहे. या आत्मकथनातील प्रत्येक पानावरील वर्णन इतके जिवंत आहे की जणू आपणच तो प्रसंग अनुभवत आहोत अशी अनुभूती मिळते. त्यामुळे वाचकाला एक गोडी निर्माण होते. आणि तो पुढे वाचतच जातो. कुठेही हे आत्मकथन वाचताना कंटाळवणे वाटत नाही. काही प्रसंगी वाचकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. इतके प्रभावी हे आत्मकथन आहे. जसे 
सीताचा हगवण व उलटीमुळे मृत्यू झाला त्यावेळी लेखकाची आजी "ढावलो" करून रडू लागली. घरासमोर जमलेल्या बाया आजींना समजावत सांगत होत्या.

 

"रो मत खमरी रो मत,तारसामु देखताळी तार तिन्ही छोरीही रोहरीछं,तार आसो रोहेती सीता मरण देवेघर चलगी,जकोळ काही होटो आयेवाळ छेई."

 

हा दुःखदायक प्रसंग वाचून डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. लेखक चंदू राठोड यांचे लग्न दुर्गा नावाच्या मुलीशी होते. आणि लग्नाच्या अगोदर मुलीचे आजोबा मरण पावतात आणि तिसऱ्या दिवशी चंद्रकला बाईची मुलगी मरण पावते. त्यामुळे लेखकाचे वडील चिडून जाऊन लेखकाची पत्नी दुर्गाला भांडू लागतात. तू पांढरा पायाची आहेस, अपशकुनी आहेस, तुझा पायगुण चांगला नाही. लग्नपत्रिका निघाल्या तेव्हा तुझा आजोबा मरण पावला, लग्न होऊन माझ्या घरी आली तर माझी सोन्यासारखी नाथ मरण पावली, या पंधरा-वीस दिवसात दोन जीव तुझ्यामुळे गेले असे म्हणून लेखकाचे वडील दुर्गाला दोष देतात. दुर्गा बिचारी निमुटपणे सगळं सहन करीत एका कोपऱ्यात बसून रडत बसते. अशा प्रसंगी लेखकाने  दाखवलेली धीरगंभीरता, संयम आणि समजूतदारपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे. शाळा सोडून म्हशी चालणारा हा माणूस आपल्या जीवनातील लाख अडचणी पार करून यशस्वी होतो हेच "जांगड" या आत्मकथनाचे यश आहे.
खरं पाहिलं तर संपूर्ण कथानकाचा नायक कोण, हा प्रश्न वाचकाला पडतो. आत्मकथनातील सर्व पात्रे त्यांचे स्वभाव, वेशभूषा आणि वातावरण वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत उभे राहतात हेच लेखक चंदू डोमा राठोड यांचे यश मानले पाहिजे.
तांडा, घर ,शिवार आणि इतर काही गोष्टीचे वर्णन लेखकांनी इतके प्रभावी मांडलेले आहे की, त्यांचे निनाद जणू ऐकू येतात. लेखकाच्या आयुष्यातील चढउतारात, त्यांना काही मंडळीकडून मिळालेले मायेचे पाठबळ सावरते. तर लेखकाच्या जडणघडणीत  काही पात्रे महत्त्वाची भूमिका बजावतात हे सुद्धा लेखकाने प्रामाणिकपणे यामध्ये नमूद केलेले आहे.
लेखकाने गोरबोली चा अतिशय योग्य वापर करून गोरबोली भाषेला अधिक जिवंतपणा दिलेला आहे. काही वाक्य आणि शब्दांची पेरणी अत्यंत प्रभावी आहे.

 

"पारी बाटी वेगी काई?"
"कोणी बा वेयरच छं."
"सळोई वेगी काई."
"याडी लोईमाही आठो मिसळनं नाकरी छं."

 

यावरून लेखकाचे गोरबोली भाषेवरील प्रेम दिसून येते. लेखक चंदू डोमा राठोड हा तांड्यामध्ये जन्मला, तांड्यामध्ये वाढला, बागडला आणि तांड्यांच्या सुखदुःखासोबत त्यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास केलेला असल्यामुळे तो आपल्या याडी- बोलीभाषेला कसा विसरेल? काही ठिकाणी वाचताना अंधश्रद्धाच्या धरतीवर काही उदाहरणे जरी लेखकांनी दिलेली असल्याचे वाटत जरी असले तरी त्यांनी अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा यातील सूक्ष्म सीमारेषा दाखवताना धामणगाव देव येथील "मुंगसाजी माऊली" यांच्या आशीर्वादरुपी प्रसंगांमधून एक अलौकिक वातावरण निर्माण केले आहे. "जांगड" या आत्मकथा मधील काही हळुवार प्रसंग, निसर्ग वर्णन, काही भयान प्रसंग वाचकाला खेळून ठेवतात. जीवन जगण्याचा संघर्षमय प्रवासाचे रोमांचकारी वर्णन म्हणजे सिद्धहस्त लेखक चंदू राठोड लिखित "जांगड" हे आत्मकथन होय!
अगदी लहान लहान तपशील असं नेमके आणि मोजक्या शब्दाच्या आधारे वाचकांसमोर प्रत्यक्ष प्रसंग उभं करणारी लेखक चंदू राठोड यांची लेखन शैली "जांगड" या आत्मकथनाच्या पहिल्या पानापासूनच वाचकाला अक्षरशः खेळून ठेवते. एकीकडे आपल्या बालपणापासून टिपलेले बारीक-सारीक तपशील आणि दुसरीकडे नाट्य कलावंत म्हणून नाटकात काम करणाऱ्या कलाकारांच्या  उलगडले जाणारे स्वभाव चित्र लेखकाने कथेत केलेली गुंफण ही वाचकांसाठी मेजवानीच आहे.

 

या संपूर्ण आत्मकथनात लेखकाची व्यक्तिरेखा विशेष उठून दिसते. आत्मकथनातील नाट्य कलाकार असलेला चंदू राठोड हा केवळ नायक म्हणून समोर येत नाही. तर संकट समयी खंबीरपणे उभे राहणारे एक भारदस्त व्यक्तीमत्व म्हणून वाचकाच्या मनात घर करते. आपले दैनंदिन जीवन जगताना लेखकांनी भीषण परिस्थितीशी दोन हात केले. काही प्रसंगी असुरक्षिततेही स्वतःचा धीर ढळू दिला नाही. लेखकांच्या स्वभावात कायम संवेदनशीलता आहे, पण त्याच वेळी संकटांना सामोरे जाण्याची ताकद ही वाखणण्याजोगी आहे. लेखक चंदू राठोड यांच्या जीवनामध्ये अनेक भीतीदायक संकटे निर्माण झाली तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाची आणि साथीदाराची काळजी घेत त्यांनी खंबीरपणे आपला जीवन संघर्ष सुरूच ठेवला त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा अधिक मानवी आणि जिवंत वाटते. एकूणच "जांगड" हे आत्मकथन केवळ एक कथा किंवा जगण्याची कहाणी नाही तर ती माणसाच्या जगण्यासाठीच्या अदम्य इच्छाशक्तीची हृदय स्पर्शी गाथा आहे. चंदू राठोड यांचे लहान वयातील समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दुर्दृष्टी आणि परिस्थितीला गंभीरपणे सामोरे जाण्याची क्षमता असे सर्व पैलू या आत्मकथनात दिसून येतात. लेखक चंदू राठोड  यांचे हे पहिले जरी आत्मकथन असले तरी ते अप्रतिम साकारल्याचे पानोपानी पटते.

 

एक नाट्य कलावंत आणि आता लेखक म्हणून मराठी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या लेखक चंदू राठोड हे साहित्यिकाच्या मंडळीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान ठरले आहे. "जांगड" या आत्मकथनामध्ये अनेक प्रसंगाची केलेली रसाळ आकर्षक पद्धतीची मांडणी मात्र नाविन्यपूर्ण आहे. त्यामुळे या आत्मकथनाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली असून वाचकांनाही "जांगड" या आत्मकथनाचे विशेष दर्शन घडेल याची काळजी  लेखकाने घेतलेली आहे व त्यात त्यांना यशही आलेले आहे.
एकूणच रंजनात्मक, संघर्षमय आणि  प्रचंड वेदनादायी संघर्ष उलगडणारे हे आत्मकथन वाचनीय आहे. "जांगड" ही कादंबरी केवळ गोरसाहित्य क्षेत्रामध्येच नाही तर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वेगळी छाप पाडणारी ठरेल यात मला अजिबात शंका नाही. एवढेच नव्हे तर तांड्यातील हतबल झालेल्या बेरोजगार युवकांना प्रेरणा देणारे हे आत्मकथन निश्चितच एखाद्या विद्यापीठांमध्ये अभ्यासल्या गेले तर नव तरुणाच्या जीवनामध्ये नक्कीच क्रांती घडेल असे माझे प्रामाणिक मत आहे. भविष्यात लेखकाकडून याहून अधिक सरस ,सुरस आणि वास्तवदर्शी लेखनाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही‌.  आज पासुन लेखक चंदू राठोड यांची नवीन ओळख "जांगडकार" म्हणूनच प्रचलित होईल! पुनश्च मी प्रसिद्ध लेखक व नाट्य कलावंत चंदू राठोड यांचे याडी परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करतो व सुयश चिंतितो धन्यवाद !!

 

"जय सेवा.... जय वसंत!"

समीक्षक - याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद

There are no reviews for this eBook.

0
0 out of 5 (0 User reviews )

Add a Review

Your Rating *

Related eBooks