Maharashtrache Shilpkar Vasantrao Naik
निवेदन
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे, अशा व्यक्तींची साधारणतः शंभर ते सव्वाशे पानांची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्राचे शिल्पकार" या योजनेअंतर्गत पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील "वसंतराव नाईक" हा चोविसावा चरित्रग्रंथ आहे.
वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत मुख्यमंत्री पद भूषविणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते.
वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणून त्यांचा या चरित्रग्रंथमालिकेत समावेश करण्यात आलेला नसून एका वेगळ्या कारणासाठी त्यांचा या चरित्रग्रंथमालिकेत समावेश करण्यात आलेला आहे.
“शेत जमिनीची किमान धारणा कितीही कमी ठेवा; परंतु सामान्य शेतकऱ्यांच्या राहणीमानाची पातळी कुठल्या कर्मचाऱ्यांच्या पातळीवर तुम्ही ठरविणार आहात, याचा निर्णय अगोदर घ्या. शासनाच्या दरबारातील सचिव, सहसचिव, सहाय्यक सचिव, कक्ष अधिकारी, लिपीक की चपराशी ? यापैकी कुठल्या पातळीवर तुम्ही शेतकऱ्याचे जीवनमान ठेवू इच्छिता?"
असा प्रश्न त्यांनी कृषीतज्ञांच्या परिषदेत एकदा विचारलेला होता. शेतकऱ्यांच्या वास्तव स्थितीचे त्यांना नेमके किती आणि कसे भान होते हे त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून प्रत्ययाला येतो.
शेतकरी हा कारखानदार व्हायला हवा, असे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली तरच शेती हा फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो; यावर त्यांची निष्ठा होती. या निष्ठेतूनच त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात योजना आखल्या आणि कार्यान्वित केल्या.
आमदार, खासदार, उपमंत्री, मंत्री व मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय कर्तृत्वाचा आलेख अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. तथापि नाईकसाहेब रमले मात्र शेतीत शेती आणि शेतकरी हा त्यांचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता. धरतीच्या कणाकणातून समृद्धी फुलली पाहिजे, हा त्यांचा उत्कट ध्यास होता. काळ्या मातीचे हिरवे स्वप्न साकार करणारा हा खरा भूमिपुत्र होता. "
“शेती यंत्राने आणि तंत्राने होणार नाही, आणि मंत्रानेही होणार नाही. शेतीत गाडून घेतल्याशिवाय ती फुलत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत मी बसलेला असलो तरीदेखील मी शेती बांधावर बसलेला आहे"
शेतीच्या बांधावर बसलेल्या महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा हा चरित्रग्रंथ मराठीच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास आहे.
रा. रं. बोराडे
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ