Varsha (वर्षा)
दोन शब्द ..
१८ ऑगस्ट, १९७९. आपल्या जीवनातला अत्यंत दुःखाचा दिवस. ह्याच दिवशी काकांवर काळाने क्रूर हल्ला केला. काळ असा अचानक त्यांच्यावर कोसळेल असे स्वप्नातही कोणाला वाटले नाही. सर्वच माणसे मर्त्य आहेत. अमर कोणीच नाही, परंतु हवा पालटण्यासाठी जाणाऱ्या काकांवर आम्हालाच सोडून जाण्याचा प्रसंग आला. काळ कोणासाठी थांबत नसतो. काकांना जाऊन आज एक वर्ष झाले. आज आठवणींच्या मोहोळाने मन व्यथीत होत आहे.
वसंतराव नाईकांचे कार्य म्हणजे प्रतिकुलतेवर मातच म्हणावी आगेल.. त्यांच्या जीवनापासून व कार्यापासून शिकण्यासारखे फार फार आहे. १ जुलै, १९१३ मध्ये पुसद तालुक्यातील सर्व बाजू डोंगरांनी वेढलेल्या गहूली तांडयात त्यांचा जन्म झाला. पहिल्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटलेल्या काळात, या देशात दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या माणसाच्या कानापर्यंतही शिक्षणाचा आवाज गेलेला नव्हता. अशा काळात दुर्गम डोंगर ओलांडून शिक्षण देण्यासाठी पाठव- ण्याची प्रेरणा आदरणीय फुलसिंग नाईकांना झाली हे मोठे आश्चर्यच आहे. कारण आज सर्व शैक्षणिक सवलती मिळत असतानाही मागासलेल्या वर्गातले बोटावर मोजण्याएवढे पालकही शिक्षणाबाबत जागरूक नाहीत. चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना चार शाळा बदलाव्या लागल्या. बालपणी हे फार गैरसोयीचे. अशा अडचणीतून किती मोठी माणसे गेली असतील ? आजच्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी ह्याचा विचार करावा. गहूलीपासून अतीदूर अस लेल्या अमरावतीला सातवी पर्यंतचे शिक्षण व नंतरच्या शिक्षणासाठी नागपूरला एका गिरीकंदरात राहणाऱ्या भटक्या जमातीच्या मुलाचे हे प्रयाण काही थोडे थोडके नाही.
नागपूर शहरातून पदवीची व कायद्याची परीक्षा पास केली. या काळात त्यांनी सर्व समाजाशी साधलेला संपर्क वाखाणण्यासारखाच. यातूनच त्यांचा एका उच्चवर्णीय व सुसंस्कृत घराण्यातल्या मुलीशी प्रेमविवाह झाला. शहरा- तल्या मुलीने मोहीत होण्यासारखे व्यक्तिमत्त्व एक तांडयातला मुलगा निर्माण करतो आणि सर्व बंधनांना झुगारून आंतरजातीय विवाह करून कृतीशील पुरो- गामीत्व सिद्ध करतो. यावरून ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर ते कर्त सुधारक होते हेही सिद्ध होते. विद्यार्थी दशेत त्यांना मिळालेल्या सत्संगतीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघाले, सुसंस्कृत झाले. ह्याचाच स्पर्श त्यांच्या भावी कार्याला झाला आहे.
त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी संबंध केव्हा आला हे निश्चित सांगता आले नाही तरी १९४२ साली ऑगस्ट मध्ये मुंबईला भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमेटीच्या बैठकीला नाईक स्वतः गेले होते व त्यावेळी गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. १९४८ ते १९५० पर्यंत पुसद तालुका कॉंग्रेस कमेटीचे ते मंत्री होते.
वसंतराव नाईक हे हाडाचे कार्यकर्ते. वकिली करण्यासाठी पुसदला आल्या- पासून स्वतःच्या व्यवसायापेक्षा सार्वजनिक कार्यात ते अधिक रस घेऊ लागले. त्या काळी खेड्यातील गरीब शेतकऱ्यांची सावकाराकडून पिळवणूक व छळवणूक फार होत असे. त्यांनी कुळांची बाजू घेतली. कुळांना कायदेविषयक मोफत सल्ला दिला. साहाय्य केले. याच काळात त्यांनी बंजारा समाजातील अनिष्ट प्रथेविरुद्ध प्रचार केला. वेशभूषा बदलून प्रमुख सामाजिक प्रवाहात सामील होण्याचे त्यांना शिक्षण दिले. मुलांमुलींना शिक्षण दिले पाहिजे याचा जीव तोडून प्रचार केला. दारूसारख्या व्यसनापासून अलिप्त राहाण्याचा प्रचार पोट- तिडकीने केला.
१९५२ मध्ये काँग्रेसतर्फे नाईकसाहेब निवडून आले, व त्यावेळच्या मध्य- प्रदेशात महसूलखात्याचे उपमंत्री झाले. १९५८ मध्ये वेगळया विदर्भाच्या मागणीविरूद्ध यशवंतरावांना त्यांनी साथ दिली. त्यासाठी त्यांना ब्रीजलाल बियाणी इत्यादींचा विरोधही पत्करावा लागला. १९५८ मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याचे शेतीमंत्री असताना चीनला जाण्याची संधी मिळाली. तेथील शेतीसुधारणेची पाहणी केली. अभ्यास केला. त्यावर चिंतन केले. शेतीबद्दल त्यांच्या मनात जो जिव्हाळा होता त्याचा उगम शेतीसुधारणा प्रयोगातून नव्हता तर शेतकरी या नात्याने तो निर्माण झाला होता. शेतकरी या नात्याने ते शेतक-यांच्या अडीअडचणीशी समरस झाले होते. शेतकऱ्यांच्या दुःखाचा आणि वेदनांचा त्यांनीही अनुभव घेतला होता.